top of page
Writer's pictureThe Read Aloud Project

तुळस / Basil

भारतात तरी ‘तुळस’ माहिती नाही अशी व्यक्ती नाही. सामान्यपणे हिंदू धर्मातील जवळजवळ सर्व महिला जागा मिळेल तेथे चाळीत, गॅलरीत, ब्लॉकमध्ये किंवा बंगल्यात एक तरी तुळशीचे झाड लावतातच. आपल्या पूर्वजांनी त्यांना माहीत असलेल्या विज्ञानाचा उपयोग सगळ्यांना व्हावा म्हणून हे विज्ञान संस्कृतीत बसविले. दिनचर्या व धार्मिक विधींमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा उपयोग त्यांनी चातुर्याने करून घेतला. जसे बेल शंकराला, दूर्वा, जास्वंद गणपतीसाठी, कमळ लक्ष्मीसाठी तशी तुळस ही विष्णूप्रिय म्हणून सांगितले आहे.


विष्णू ही देवता सृष्टीची निर्माण करणारी देवता (ब्रह्मा, विष्णू, महेश) म्हणून मानली जाते. ही देवता शेषशायी नागावर आरूढ होऊन समुद्रात वास्तव्य करते. पाण्यामुळे थंडी व सर्दीचा त्रास संभवतो तो घालवण्यासाठी त्यास सर्दीहारक तुळस लागते. वैद्य दातारशास्त्री नेहमी सर्दीखोकल्याच्या रोग्यांना सोप्पा उपाय सांगत. एका फुलदाणीत पाणी घेऊन त्यात तुळशीची एक जुडी ठेवून ती रुग्णाच्या पलंगाशेजारी डोक्याशी ठेवल्यास सर्दीचा त्रास तुळशीच्या अस्तित्वाने कमी होतो. थोडक्यात थंडीमुळे होणारे आजार तुळशीमुळे घालवता येतात.


आपण आपल्या घरात जी तुळस लावतो तिचे वर्गीकरण फॅब्लिी लिबियाटीत केलेले आहे. जगात या वर्गाच्या १६० प्रजाती आहेत. भारतात २६ प्रकार आहेत. याच वर्गात सब्जा, मरवा, छोटय़ा पानांचा ओवा, रोजमेरी, इ. प्रकार आहेत. या वनस्पती झुडूप वर्गात मोडतात. त्या सुगंधी असतात व त्यांच्या दांडय़ांवर आणि पानांवर तेलाने भरलेले केसांसारखे पिंड असतात. या सर्व वनस्पती औषधासाठी वापरल्या जातात.


तुळशीच्या पानातून ओझोन (०३) हा वायू बाहेर पडतो. या वायूमुळे मन प्रसन्न, आनंदी राहते. साधारण सकाळच्या वेळी तुळशीला प्रदक्षिणा घालतात, पूजा करतात. त्या वेळी ओझोन बाहेर पडत असतो. त्या काळात महिलांना घराबाहेर मॉर्निग वॉकला जाण्याची पद्धत नव्हती. महिलांनी आरोग्याच्या दृष्टीने तुळशीच्या सान्निध्यात जर सकाळचा काही वेळ घालवला तर त्यांचे आरोग्य चांगले राहील व त्यामुळे कुटुंबाचेसुद्धा आरोग्य त्यांच्यामुळे चांगले राहील.


आपल्याकडे तुळशीचे सामान्यपणे तीन प्रकार लावले जातात. यात रामतुळस (हिरवी), कृष्णतुळस (काळसर पाने) व कापूर तुळस हिच्या पानांना कापरासारखा वास येतो. यातील कापूर तुळस ही उंच वाढणारी बहुवर्षीय आहे. तुळशीचे औषधी गुणधर्म मंजिरी (फुले) आल्यावर कमी होतात. यासाठी मंजिऱ्या सातत्याने काढल्या जाऊन त्या देवास वाहतात. तुळशीच्या अस्तित्वाने आजार बरे होतात, यासाठीच पूर्वजांनी ती देवप्रिय म्हटले आहे. धार्मिक भावनेने का होईना आपण ती घरात लावतो व आरोग्य चांगले राखतो.



16 views0 comments

Comments


bottom of page